शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील पी.पी. पाटील नगर परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली असून, पोटच्या मुलीला जाचातून वाचवण्यासाठी माहेरी आणणाऱ्या सासूवरच जावयाने हल्ला करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव येथील ४२ वर्षीय महिलेच्या मुलीने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रहिवासी यश सुनील चंदनकत्री याच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, विवाहानंतर काही दिवसांतच आरोपीने पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून पीडित मुलगी माहेरी आली होती.
दरम्यान, २ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी यश चंदनकत्री हा सूडाच्या भावनेने सासरच्या घरी आला. त्याने ‘बायको कुठे आहे?’ अशी विचारणा केली असता सासूने मुलगी मावशीकडे गेल्याचे सांगितले. याच कारणावरून संतप्त झालेल्या आरोपीने सासू-सासऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यानंतर आरोपीने सर्व मर्यादा ओलांडत सासूचा विनयभंग केला. तसेच ‘माझ्यासोबत चल, तुला बायकोसारखे वागवतो’ अशी लाजिरवाणी मागणी करत, मुलीला परत न पाठवल्यास दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी यश सुनील चंदनकत्री याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील सुसर हे करीत आहेत.
या घटनेमुळे शेगाव शहरात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.














