मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील शासकीय वसतीगृहाच्या निष्काळजी कारभारामुळे एक दुर्दैवी घटना घडली असून वसतीगृहातील पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे शासकीय मुलांचे वसतीगृह असून येथे सुमारे ४५ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. वसतीगृहाचे व्यवस्थापक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसतीगृह सुरू असले तरी विद्यार्थ्यांच्या हालचालींवर योग्य देखरेख नसल्याचे समोर आले आहे.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने वसतीगृहातील काही विद्यार्थी जवळच असलेल्या खडकपूर्णा पाट येथे पोहण्यासाठी गेले होते. यावेळी स्वराज गणेश खरात हा विद्यार्थी पाण्यात उतरला असता त्याचा तोल जाऊन तो पाटाच्या पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व शोधमोहीम सुरू केली. शोध घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थी पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मृत आढळून आला. मृत विद्यार्थी हा कोलारा येथील रहिवासी असून अंचरवाडी येथील शिवाजी हायस्कूल, अंचरवाडी येथे इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. तसेच तो शिवाजी मागासवर्गीय वसतीगृहात राहत होता.
या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचासमक्ष पंचनामा केला. मात्र, वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
दरम्यान, वसतीगृहाच्या निष्काळजी कारभारामुळे ही घटना घडल्याची चर्चा परिसरात होत असून संबंधितांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अंचरवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.













