चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील हातणी येथे काल रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत घरगुती वादातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री काका विनोद जाधव व काकू यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी नातेवाईक गोपाल जाधव हे घरी गेले. वाद मिटवून गोपाल घरी परतले व झोपले असताना, काका विनोद जाधव यांनी लोखंडी हत्याराने गोपाल यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत गोपाल जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना रात्री उशिरा उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. खून केल्यानंतर आरोपी काका विनोद जाधव हे घरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या मक्याच्या शेतात जाऊन लपून बसले.
गावकऱ्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे हातणी गावात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.












