बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) : गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा शहरात किरकोळ कारणांवरून मारहाणीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार शहरातील टीपू सुलतान चौक परिसरात उघडकीस आला आहे. लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हाणामारीत झाले.
टीपू सुलतान चौक परिसरात राहणाऱ्या समीना परविन शेख रफिक (वय ३८) यांचा मुलगा शेख मुजम्मील हा गल्लीतीलच मित्र शेख मन्सूरसोबत खेळत होता. खेळताना थट्टा-मस्करी सुरू असताना चुकून शम्मी परवीन या महिलेला मुलांचा धक्का लागला. याचा राग मनात धरून शेख आबीद शेख रफिक याने थेट मुजम्मीलला पकडून मारहाण सुरू केली.
मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून समीना परविन व त्यांचे पती शेख रफिक हे भांडण सोडवण्यासाठी धावून आले. मात्र, यावेळी आरोपी शेख आबीद याने हातातील लोखंडी साखळीने शेख रफिक यांच्यावर अमानुष हल्ला चढवला. या हल्ल्यात रफिक यांच्या डाव्या हाताच्या दंडावर व डाव्या पायाच्या पोटरीवर गंभीर जखमा झाल्या. तसेच आरोपीचा साथीदार शेख अहमद शेख अशदानी याने समीना परविन यांना लोटपाट करत रफिक व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
काही वेळानंतर शकीलाबाजी नावाच्या महिलेने मध्यस्थी करून भांडण सोडवले. जखमी अवस्थेत पीडित कुटुंब बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पोहोचले असता, पोलिसांनी त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
या प्रकरणी समीना परविन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी शेख आबीद शेख रफिक व शेख अहमद शेख अशदानी (रा. टीपू सुलतान चौक, बुलढाणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील करीत आहेत.













