चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली-खामगाव-जालना महामार्गावर छोटा मेरा आणि असोला गावाच्या मध्ये आज भीषण अपघात घडला. चिखलीतील बेराळा येथील रहिवासी आणि पत्रकार राजेंद्र उर्फ राजू सुरडकर (वय अंदाजे ३६-३७) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं पत्रकार वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू सुरडकर हे स्विफ्ट डिझायर कारमधून आणखी तिघांसह प्रवास करत होते. गाडी भरधाव वेगात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात जाऊन आदळली. धडकेचा जोर एवढा होता की गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
या अपघातात राजू सुरडकर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आलं; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं. गाडीतले उर्वरित तिघे जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे चिखली परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.














