बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्हा न्यायालय परिसरात आज दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. साक्ष देण्यासाठी आलेल्या साक्षीदारावरच आरोपीने चाकूने हल्ला केल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २.१० वाजता न्यायालयाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. आरोपी विष्णू भगवान तायडे (वय ६४) याने आपला साळा श्रीकृष्ण तिडके (वय ३६) याच्यावर चाकूने वार केला. जखमी तिडके यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सदर घटनेनंतर पोलिसांना तात्काळ पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात आरोपी सकाळपासूनच स्वतःजवळ चाकू बाळगून असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणामागे कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी असल्याचे उघड झाले आहे. आरोपीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा न्यायालयात सुरू असून, त्याच प्रकरणात साक्ष देण्यासाठी साळा न्यायालयात आला होता. चार वर्षांपूर्वी आरोपीच्या छळाला कंटाळून त्याची पत्नी व मुलांनी विष प्राशन केल्याची घटना घडली होती. यात मुलाचा मृत्यू झाला होता, तर पत्नी व मुलगी बचावल्या होत्या.
आज मुलीने न्यायालयात साक्ष दिल्यानंतर ती आपल्या मामासोबत बाहेर पडत असताना आरोपीने रागाच्या भरात हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही आरोपीने पत्नी व साळ्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयात येणाऱ्यांची तपासणी कडक करण्याची तसेच मेटल डिटेक्टरद्वारेच प्रवेश देण्याची मागणी होत आहे.
पोलिस पुढील तपास करीत आहेत.














