चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज):१९व्या शतकापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या काळोना (मौजा क्रमांक १) गावाचे नाव आजही महसूल पटलावर नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असतानाही आमच्या गावाचे स्वतंत्र अस्तित्व नाकारले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.मतं मागायला येता, पण रस्ता-पाणी द्यायला नाही? गाव आहे, पण सरकारला दिसत नाही…!सांगून-सांगून थकलो; आज पासून बेमुदत उपोषण सुरू आम्ही गावातील ग्रामस्थ नी सुरू केले आहे या उपोषणात युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांचा नेतृतात गावकऱ्यांनी उपोषण सुरू केला आहे…!
काळोना पाटी ते काळोना गाव या अडीच ते तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक वर्षांपूर्वी माती व गिट्टी टाकून तात्पुरता रस्ता करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या रस्त्याकडे कुणीही फिरकले नसल्याने सध्या या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आजारी रुग्णांना दवाखान्यात नेणे जीवघेणे ठरत असून, उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या रस्त्याबाबत जिल्हा परिषद व संबंधित विभागांकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने हा रस्ता आमच्या अधिकारात नसल्याचे सांगून हात झटकले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
यासोबतच पाटबंधारे विभागाने आजूबाजूच्या सर्व गावांना पाण्याची सोय उपलब्ध करून दिली असताना काळोना गावातील शेतकऱ्यांना मात्र खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. गावाला स्मशानभूमीसारखी मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाही. महसूल नकाशावर गावाचे नावच नसल्याने आमचे अस्तित्वच पुसण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या सर्व समस्यांमुळे गावातील अनेक कुटुंबे इतर गावांकडे स्थलांतर करत असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने देऊन, चकरा मारूनही न्याय न मिळाल्याने ग्रामस्थांनी आता निर्णायक भूमिका घेतली आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
काळोना पाटी ते काळोना गाव रस्त्याचे डांबरीकरणासह तातडीने काम करावे.पाटबंधारे विभागाने काळोना गावाला पाटाची व्यवस्था करून खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमी मंजूर करावी.
काळोना गावाचे स्वतंत्र नाव महसूल पटलावर नोंदवावे.
या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आज सकाळ पासून ९ फेब्रुवारी २०२६ रोजी चिखली–इसरूळ रस्त्यावरील काळोना पाटीजवळ सर्व ग्रामस्थ महिला मंडळीसह आमरण उपोषणास बसल्या आहेत. तसेच, पुढील काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांवर स्पष्ट मतदान बहिष्कार टाकण्यात येणार असून, त्यातून उद्भवणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. उपोषण कर्ते म्हणून संतोष भुतेकर, समाधान उसर, मधुकर उसर, बबन उसर, रमेश उसर, दत्तू उसर, रंगनाथ शिंदे, सुगदेव गाडेकर,या सह गावातील ग्रामस्थ उपोषण सुरू केले आहे त्यात ठिकाणी भाजपा युवा नेते प्रसन्न घुबे, शिवसेना नेते पंजाब जावळे, राष्ट्रवादी नेते विशाल थुट्टे, गोपाल गाडेकर, भाजपा नेते रंगनाथ वरपे, यास अनेक जण पाठिंबा देऊन गेले…
“देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, तरीही चिखली तालुक्यातील काळोणा गावाला आजवर नकाशावर स्वतंत्र ओळख नाही! गावाला ये-जा करण्यासाठी साधा डांबरी रस्ताही मंजूर होत नसेल, तर ही केवळ दुर्लक्षाची नव्हे तर अन्यायाची परिसीमा आहे.जोपर्यंत काळोणा गावाला स्वतंत्र नाव व डांबरी रस्ता मंजूर होत नाही, तोपर्यंत आम्ही सहगावकरी बेमुदत उपोषणावर ठाम आहोत!”
— संतोष भुतेकर
युवा सेना, उपजिल्हा प्रमुख
















