साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):
येथील एक अल्पवयीन मुलगी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी मुलीच्या आजी केसरबाई पारधे यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे मोठा खुलासा केला आहे. तपासात मुलीचे अपहरण झाले नसून, नात्याने काकू असलेल्या मिराबाई पारचे हिनेच पुतणीला पळवून नेल्याचे उघड झाले आहे. संबंधित महिलेने मुलीला काळी-पिवळी वाहनातून चिखली येथे बोलावून घेतले व तेथून तिला जळगाव (खान्देश) येथे नेले. तेथे शुभम विनोद पाटील या युवकासोबत अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.
या प्रकारातून संबंधित काकूने पैशांची देवाणघेवाण केल्याचेही समोर आले असून, तिचे गुजरात राज्यात अनेक व्यक्तींशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यापूर्वीही अशाच पद्धतीने काही मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची इतर समाजातील युवकांशी लग्ने लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित महिलेने स्वतः चार ते पाच वेळा विवाह केल्याची आणि अनेक युवकांची फसवणूक केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणात साखरखेर्डा पोलिसांनी मिराबाई पारचे व शुभम विनोद पाटील यांना जळगाव (खान्देश) येथून अटक केली. आज ९ फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, महिला आरोपीस न्यायालयीन कोठडी, तर शुभम विनोद पाटील यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलीस करीत आहेत. दरम्यान, काल सायंकाळी आणखी एक युवती घरातून बेपत्ता झाल्याची माहिती असून, तिने परस्पर एका युवकासोबत विवाह केल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात अद्याप पोलीस तक्रार दाखल नसली तरी संबंधित विवाहाचे फोटो पोलिसांना प्राप्त झाले असल्याची माहिती आहे.














