बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील चांडक लेआउट परिसरात घरकामासाठी गेलेल्या महिलेच्या कामाच्या ठिकाणीच तिच्या नवऱ्याने धिंगाणा घालत शिवीगाळ करून दरवाजाची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,चंद्रप्रभा लागे या शहरात घरकाम करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे पती जगदीश सग्खाराम लागे (वय ५४) हे दारू पिण्याच्या सवयीचे असून, पत्नी घरकामाला जाते यावरून वारंवार वाद घालत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी चंद्रप्रभा लागे या एका घरात धुणी-भांडीचे काम करत असताना आरोपी तेथे पोहोचला. “इकडे काम कशाला करतेस?” असा जाब विचारत त्याने अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता संतापाच्या भरात दरवाजावर दगड मारून अंदाजे २ हजार रुपयांचे नुकसान केले.
याप्रकरणी महिलेच्या तोंडी फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिट अंमलदार रविंद्र हजारे हे करीत आहेत.














