मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना २८ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी बाराखेडी पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावातील पाण्याच्या टाकीजवळ किरण ज्ञानदवे सातव या युवकाने पीडित तरुणीचा वाईट उद्देशाने हात पकडला. तसेच “तू माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकीन,” अशी धमकी दिली. या प्रकारामुळे तरुणी घाबरून गेली असून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बाराखेडी पोलीस स्टेशन येथे आरोपी किरण सातव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४ व ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ श्रीकांत चिटवार करीत आहेत.














