मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): पुणे येथून हिवरखेडकडे दुचाकीने जात असलेल्या २२ वर्षीय तरुणाला अंढेरा घाटात भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते २.३० वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गणेश रामचवरे (वय २२, रा. हिवरखेड) हा पुणे येथून दुचाकी क्रमांक एमएच ३० सीसी ०६९८ ने हिवरखेडकडे जात होता. अंढेरा घाटातून जात असताना भरधाव व निष्काळजीपणे आलेल्या अज्ञात वाहनाने संतोषच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात संतोष गंभीर जखमी झाला. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचासमक्ष पंचनामा केला.
याप्रकरणी फिर्यादी विशाल शेषराव काटोने यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ व २८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन सांगळे करीत आहेत.















