शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील छत्रपती संभाजी चौक परिसरातून एका तरुणीला दुचाकीवर बसवून आनंद सागर परिसरातील लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप करीत शेगाव शहर पोलिसांत २५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(२), ६४(२)(एफ), ६४(२)(एम) तसेच पॉस्को कायद्यातील कलम ६, १० व १२ अन्वये कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२६ मध्ये पीडित तरुणी छत्रपती संभाजी चौक परिसरातील जय कम्प्युटर्स येथे टायपिंगच्या क्लाससाठी गेली होती. यावेळी आरोपी अभिषेक दाभाडे (वय २५) तेथे आला. त्याने धमकावून तरुणीला दुचाकीवर बसविले आणि आनंद सागर परिसरातील एका लॉजवर घेऊन गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
लॉजवर नेल्यानंतर आरोपीने तरुणीवर जबरदस्ती केल्याचा आरोप असून, याबाबत कोणाला काही सांगितल्यास तिला तसेच तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच आरोपीकडून वारंवार धमक्या देऊन मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडितेच्या तोंडी रिपोर्टवरून शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.













