खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील जिजाऊ नगर परिसरात वीजचोरी केल्याप्रकरणी पती-पत्नी विरुद्ध खामगाव शहर पोलिस ठाण्यात २७ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत उत्तमराव कलोरे यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, प्रकाश भगवानराव टिकार व त्यांच्या पत्नी (रा. प्लॉट क्र. ९७ बी, जिजाऊ नगर, खामगाव) यांच्या घराची २६ फेब्रुवारी रोजी पथकासह तपासणी करण्यात आली.
या तपासणीत संबंधितांनी तब्बल १९ महिन्यांपासून बेकायदेशीररीत्या ६,२५७ युनिट वीज वापर केल्याचे उघडकीस आले. या वीजचोरीची रक्कम अंदाजे १ लाख ८० हजार ७७४ रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले.
विद्युत कायदा २००३ (सुधारित २००७) च्या कलम १३५ नुसार वीजचोरी हा दखलपात्र गुन्हा असून, संबंधितांना १४ हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, मुदत देऊनही त्यांनी रक्कम भरली नसल्याने अखेर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














