लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील चिखला काकड गावात सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. उबाठा शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना गावातील काही जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मारहाण गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी केल्याचा गंभीर आरोप संजीवनी वाघ यांनी केला आहे.
संजीवनी वाघ यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी गावात अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र तो पुतळा हलवण्याचा प्रयत्न सरपंचांकडून सुरू होता. त्याला विरोध केला असता आपल्यावर हल्ला करण्यात आला, तसेच अंगावरील कपडे फाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विशेष म्हणजे, हा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीतच घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे गावात संतापाचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संजीवनी वाघ यांनी भावनिक प्रतिक्रिया देत व्हॉट्सॲपवर अत्यंत टोकाचा इशारा देणारे स्टेटस ठेवले आहे. यामुळे गावातील वातावरण आणखी तणावपूर्ण झाले आहे.
घटनेची चौकशी सुरू असून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे













