दर्शनाला गेलेली लेकरूच गायब;  मलकापूर शहरात खळबळ….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घिर्णी येथे घडली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

बहापुरा ता. मलकापूर येथील रहिवासी श्रीकृष्ण रामभाऊ सातव (वय ४०) यांची मुलगी संगीता सातव (वय १७ वर्षे ८ महिने) ही ८ फेब्रुवारी रोजी तिची आजी सत्यभामाबाई यांच्यासोबत घिर्णी येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेली होती. दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास तिची आजी लघुशंकेसाठी गेली असता, काही वेळातच संगीता तेथून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले.

आजीने तात्काळ परिसरात शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही. त्यानंतर वडील श्रीकृष्ण सातव यांनी नातेवाईक, मित्र-मैत्रिणी तसेच परिसरात शोध घेतला; परंतु मुलीचा कुठलाही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. बेपत्ता मुलीचे वर्णन असे – उंची अंदाजे ५ फूट, रंग गोरा, बांधा सडपातळ असून अंगात काळ्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सचिन पाटील करीत असून, संबंधित मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ मलकापूर शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!