चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया मंगळवारी (दि. १३) पार पडली असून, या निवडणुकीत शिंदेसेनेच्या वैशाली खेडेकर यांनी बाजी मारली आहे. हात वर करून घेण्यात आलेल्या मतदानात खेडेकर यांना १६ मते, तर काँग्रेस–राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडीच्या सुनीता शिंगणे यांना १३ मते मिळाली.
पालिकेतील सत्तासमीकरण अत्यंत चुरशीचे असताना, एक-एक मत निर्णायक ठरले. भाजपकडे १३ तर काँग्रेसकडे १२ नगरसेवक असतानाही, शिंदेसेना व राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकांनी या निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावली आहे.निवडणुकीपूर्वी कॉग्रेस मध्ये असलेले निलेश गावंडे यांचे नगराध्यक्षपदाची उमेदवारी अचानक कापण्यात आली .
त्यामुळे गावंडे सरांनी अर्जभरण्यासाठी काही तास शिल्लक असताना अजितदादाचे घड्याळ हातात बांधून राष्ट्रवादी कॉग्रेसला नवसंजीवनी दिली निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीची युतीच्या मिनल गावंडे आणि वैशाली खेडेकर विजयी झाल्या .
कॉग्रेसवर नाराज असलेल्या गावंडे दाम्पत्याची नाराजी दूर करण्यासाठी कॉग्रेसने मिनल गावंडे यांना गटनेतेपद दिले आणि प्राध्यापक निलेश गावंडे यांना कॉग्रेसच्या कोट्यातून स्वीकृत सदस्य बनवले.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे यांनी भाजप–शिंदेसेना युतीच्या बाजूने मतदान केल्याने निकालाचे पारडे झुकले. खेडेकर यांची निवड तीन मतांच्या फरकाने निश्चित झाली.
दरम्यान, स्वीकृत सदस्यपदी काँग्रेस–राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडीकडून प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, तर भाजपकडून सागर पुरोहित व सुरेंद्र ठाकूर यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी काम पाहिले.
नगरपालिका निवडणुकीपूर्वी चिखलीत झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर आता वातावरणात समोपचाराची चिन्हे दिसत असून, राजकीय कटुता कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, संख्याबळ असूनही प्रमुख पक्षांना छोट्या पक्षांच्या टेक्यावर सत्ता सांभाळावी लागणे, हा राजकीय मोठेपणा की अपरिहार्यता? असा प्रश्न चर्चेत आहे.














