Advertisement Advertisement

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; ट्रॅव्हल्स बसची ट्रकला जोरदार धडक, लक्झरी ट्रॅव्हल्स मधले 20 ते 25 प्रवासी…..

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच सोमवारी (दि. ८ जून) पहाटे मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ आणखी एक भीषण अपघात घडला. पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या एका लक्झरी ट्रॅव्हल्स बसने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २० ते २५ प्रवासी जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बाबा ट्रॅव्हल्स’ची लक्झरी बस (क्रमांक MH 31 FC 7468) पुणे येथून नागपूरच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जात होती. सोमवारी पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास बस पिंपरी माळी गावाजवळून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर बसचा पुढील भाग चेंगरल्याने काही प्रवासी वाहनात अडकून पडले होते. त्यामुळे सुरुवातीला बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने अथक प्रयत्न करून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले आणि जखमींना तातडीने उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून गंभीर जखमी प्रवाशांवर विशेष वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आणि महामार्ग प्रशासनाने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

या अपघाताचे नेमके कारण काय, याचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. समृद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!