चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दोन महत्त्वाचे ग्रामीण रस्ते खुले करण्यात आले असून संबंधित कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत चिखली तहसीलचे नायब तहसीलदार श्मुरलीधर गायकवाड यांनी प्रशासनाच्या वतीने समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ३० ऑक्टोबर २०२५ रोजी मंजूर झालेला सवना येथील गजानन इंगळे यांचे शेत ते शेलुद हा सुमारे तीन किलोमीटर लांबीचा शेतरस्ता विविध कारणांमुळे अनेक दिवसांपासून बंद होता. प्रशासन व स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून हा रस्ता तब्बल तीस फूट रुंदीने पूर्णपणे खुला करण्यात आला असून रस्त्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) अंतर्गत मंजूर झालेला हराळखेड ते डूमा हा साडेतीन किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित होता. या रस्त्याच्या जवळपास दोन किलोमीटर भागाची आखणी करून तो मोकळा करण्यात आला असून चार जेसीबी मशिनच्या सहाय्याने आजच सुमारे चाळीस फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात ठेकेदारामार्फत प्रत्यक्ष बांधकाम कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.
या दोन्ही रस्त्यांवरील अडथळे दूर झाल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीमालाची वाहतूक, दळणवळण आणि एकूणच ग्रामीण विकासाला चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.















