चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ मार्गावरील पुलावर सिमेंट वाहतूक करणारा ट्रक घसरून पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 18 BH 5499 क्रमांकाचा ट्रक धुळे येथील असून, तो सिमेंट घेऊन जात असताना देऊळगाव घुबे गावालगत असलेल्या पुलावरून घसरून खाली पलटी झाला. ट्रकमध्ये तीन जण असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या पुलाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पुलाच्या साईडला योग्य प्रकारचे कठडे नसणे तसेच रस्त्यावर अद्याप डांबरीकरण अथवा रोड कोटिंगचे काम पूर्ण न झाल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा स्थानिक ग्रामस्थांचा प्राथमिक अंदाज आहे.
पुलाचे काम अर्धवट असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पुलाचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागाने तातडीने पुलाचे अपूर्ण काम पूर्ण करून साईड कठडे व आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
अपघातातील तिघांची प्रकृती व त्यांना झालेल्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. अपघाताची नेमकी कारणे संबंधित यंत्रणेच्या तपासानंतर स्पष्ट होतील.













