अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा फाटा येथे अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार व महसूल पथकावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर तब्बल दोन आठवड्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी हर्षल मनोहर अंभोरे (रा. एकलारा, ता. चिखली) अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ सप्टेंबरच्या पहाटे त्याला जेरबंद केले.
आरोपीच्या अटकेमुळे महसूल विभागासह नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणाला आता महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
१९ ऑगस्ट रोजी महसूल पथकावर हल्ला…
देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, वाहनचालक संतोष भोपळे आणि शिपाई पंजाबराव ताटे हे पथक १९ ऑगस्ट रोजी अंढेरा फाटा येथे अवैध रेती वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेले होते. कारवाईदरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून महसूल पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात हर्षल अंभोरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), १३२, ३०३(२), १२६(२), ४५, ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी फरार झाल्याने त्याला शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन…
मुख्य आरोपीला अटक होत नसल्याने महसूल कर्मचारी आणि संबंधित संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. १९ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्यात आले, तर २४ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते. आरोपीच्या अटकेसाठी महसूल संघटनांनी प्रशासनावर दबाव वाढविला होता.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या दालनात संबंधित महसूल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह महसूल आणि पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पोलिस प्रशासनाने मुख्य आरोपीला १० सप्टेंबर २०२६ पर्यंत अटक करण्याचे ठोस आश्वासन दिले. त्यानंतर महसूल संघटनांनी कामबंद आंदोलन स्थगित केले.
मुदत संपण्यापूर्वीच आरोपी जेरबंद….
पोलिस प्रशासनाने दिलेल्या मुदतीला अद्याप सहा दिवसांचा अवधी बाकी असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी हर्षल अंभोरे याचा ठावठिकाणा शोधून काढला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत कारवाई करत ४ सप्टेंबरच्या पहाटे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
या कारवाईमुळे महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या प्रकरणातील तपासाला वेग येण्याची शक्यता असून, अवैध रेती वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेतील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
यांनी बजावली कामगिरी….
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे, पोलीस अंमलदार शरद गिरी, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, पुरुषोत्तम आघाव, अमोल अंभोरे, महिला पोलीस अंमलदार पूजा जाधव, विलास भोसले, राजू आडवे, पवन मखमले, कैलास ठोंबरे आणि ऋषिकेश खंडेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.













