पाण्याच्या टाक्यांवरून भांडण तापलं, तरुणाच्या पोटात-छातीत चाकू खुपसला; १२ वर्षांनी आरोपीला ३ वर्षांची जेल….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): घराच्या मागे पाण्याच्या टाक्या ठेवल्याच्या क्षुल्लक वादातून तरुणाच्या पोटावर, छातीवर आणि खांद्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश सी. एम. बादल यांनी ३ सप्टेंबर रोजी हा निकाल दिला.
ही घटना १८ ऑक्टोबर २०१४ रोजी खामगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली होती. शकुंतला अंबादास जाधव यांच्या घराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. याच कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात झाले.
या भांडणादरम्यान आरोपी भानुदास पांडूरंग अतकरे याने शकुंतला जाधव यांचा मुलगा शिवदास याच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपीने शिवदासच्या पोटावर, छातीवर आणि खांद्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी शकुंतला जाधव यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०७, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केल्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल केले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ येथे न्यायाधीश सी. एम. बादल यांच्या समोर झाली. सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाने एकूण ११ साक्षीदार तपासले. त्यापैकी शकुंतला जाधव, सुनीता जाधव, पायल जाधव आणि देविदास जाधव यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या साक्षीदारांनी घटनेबाबत प्रत्यक्ष माहिती न्यायालयासमोर मांडली.
अभियोजन पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी भानुदास अतकरे याला ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तब्बल १२ वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा निकाल लागल्याने या निकालाकडे परिसराचे लक्ष लागले होते.













