Advertisement Advertisement

श्रींच्या पालखीच्या गर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ! १४ भाविकांच्या गळ्यातलं सोनं लांबवलं; २५ लाखांवर डल्ला, पाच चोरटे पोलिसांच्या जाळ्यात….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ‘साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा’ या भावनेतून संतांच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक भक्तिभावाने सहभागी होतात. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रींच्या पालखी सोहळ्यादरम्यान खामगाव आणि शेगाव परिसरात तब्बल १४ हून अधिक भाविकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन, मंगळसूत्र व इतर दागिने लंपास करण्यात आले. चोरी गेलेल्या दागिन्यांची आजच्या बाजारभावानुसार किंमत २५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी शेगाव शहर, शेगाव ग्रामीण आणि खामगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

श्रींची पालखी खामगाव मुक्कामानंतर १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता शेगावकडे मार्गस्थ झाली. यावेळी पालखीसमवेत मोठ्या संख्येने भाविक चालत होते. गर्दीचा फायदा घेत टोळीतील चोरटे सक्रिय झाले आणि वेगवेगळ्या ठिकाणी भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले.

खामगाव शहरातील उद्योजक सतीष राठी यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोन्याची चैन आणि निलम खड्यांचे पेंडंट असा सुमारे १० लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. तसेच शेगाव येथील रेणुका नगर परिसरातील वैशाली गजानन शेळके यांच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र खामगाव-शेगाव मार्गावरील मानवधर्मजवळ चोरीस गेले.

याच ठिकाणाहून खामगाव सिव्हील लाईन परिसरातील गीता महेश परदेशी यांचेही मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. संदीप गणपत मरगळे, रा. मौदा, जि. नागपूर यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जयपूर लांडे फाट्याजवळ चोरीस गेली. पोलिसांच्या नोंदीनुसार या चैनची किंमत १ लाख २० हजार रुपये असून, सध्याच्या बाजारभावानुसार तिची किंमत सुमारे ४ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

फुलेनगर-माळीपुरा परिसरातील अशोक नामदेव काठोडे यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन नवोदय विद्यालयाजवळून चोरीस गेली. तसेच अशोक अभिषेक ओमप्रकाश अग्रवाल यांच्या गळ्यातील सोन्याची चैन अन्नकुटीजवळून लंपास करण्यात आली. शंकर अग्रवाल यांची सोन्याची चैनही पालखीतील केळी वाटपाच्या वेळी चोरट्यांनी हातोहात लंपास केली.

शेगाव येथील रोकडिया नगर परिसरातील वैशाली अर्जुन गिते यांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन्नकुटीजवळ चोरीस गेले. पालखी शेगाव शहरातून मार्गस्थ होत असताना वनमाला अरुण तेल्हारकर, स्वाती खडसे, ज्योती खडसे, मोहन खानजोडे, रुपाली भारसाकळे आणि कल्पना बोकडे यांच्याही गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व चेन चोरट्यांनी लंपास केल्या.

या प्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२४/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रोहिल मिलिंद शिंदे (रा. वजीरखेडा, ता. भोकरदन, जि. जालना), कोहिनूर बादल वाघरी (रा. दांडीपाडा, बोईसर ईस्ट, सरावली, पालघर), नितुशा शंकर भोसले (रा. साईनगर, पातूर, जि. अकोला), गायत्री कोहिनूर वाघरी (रा. दांडीपाडा, बोईसर ईस्ट, सरावली, पालघर) आणि सुधीर रावसाहेब कराळे (वय २१, रा. धामणगाव देवीचे, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींकडून ४ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पालखीतील गर्दीत आणखी कोणत्या भाविकांना या टोळीने लक्ष्य केले आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पालखी सोहळा भक्तांसाठी श्रद्धेचा आणि आनंदाचा असला, तरी गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाल्याने भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे मोठ्या धार्मिक सोहळ्यांमध्ये भाविकांनी दागिने व मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!