चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :
चिखली विधानसभा मतदारसंघातील केळवद येथे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडले. या लोकार्पण सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव श्री. विद्याधर महाले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. विद्याधर महाले म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून आधुनिक भारताच्या सामाजिक व वैचारिक क्रांतीचे महानायक आहेत. त्यांच्या विचारसरणीमुळेच देशात समानता, न्याय व बंधुतेची भक्कम पायाभरणी झाली. बाबासाहेबांमुळेच हा देश आज एकसंघ राहिला असून त्यांच्या देशावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या महान कार्यामुळे भारत आज अखंड व सार्वभौम राष्ट्र म्हणून जगासमोर ठामपणे उभा आहे.”
माता रमाई आंबेडकर यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “माता रमाई यांच्या त्याग, सहनशीलता व समर्पणाशिवाय भीमरावांचे ‘बाबासाहेब’ होणे शक्य झाले नसते. त्यांच्या संघर्षमय जीवनामुळे बाबासाहेबांना शिक्षण व सामाजिक कार्यासाठी आवश्यक आधार मिळाला. त्यामुळे माता रमाई यांचे योगदान भारतीय समाजाच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील.
माता रमाई आंबेडकर जयंतीच्या औचित्याने उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याला ‘द सिम्बॉल ऑफ नॉलेज’ असे नामकरण करण्यात आले असून, हा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना शिक्षण, समानता व सामाजिक न्यायाचा संदेश देत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विचारांना अनुसरण्याचा संकल्प व्यक्त केला.













