बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):सासुरवाडीला भेट देऊन रात्री घरी परतत असलेल्या जावयाचा भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना येळगाव ते साखळी दरम्यान पैनगंगा नदीच्या पुलाजवळ ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महेश कडूबा लोढे (वय ३०, रा. मोहदरी, ता. मेहकर) असे मृत तरुणाचे नाव आहे. महेश हे बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे त्यांच्या सासुरवाडीला भेट देऊन स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच-२८-बीक्यू-२४१८)ने आपल्या गावी परत जात होते. मध्यरात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास बुलढाणा–चिखली मार्गावरील साखळी फाट्याच्या अलीकडे पैनगंगा नदीच्या पुलाजवळ भरधाव वेगातील ट्रक (क्रमांक बीआर-०६-८४१२)ने त्यांच्या कारला जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात महेश लोढे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मृतक महेश यांचे काका केशव माधवराव लोढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस हवालदार सुनीता खंडारे यांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विकास सोनुने करीत आहेत.














