करवंड शिवारात धोडप येथील शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला…! हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी…

धोडप (राधेश्याम काळे : बुलडाणा कव्हरेज न्युज) — चिखली तालुक्यातील धोडप येथील करवंड शिवारात शेतात कामासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकरी उत्तम बळीराम परिहार यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात परिहार हे गंभीर जखमी झाले आहेत.


उत्तम परिहार यांच्या शेतात हरभरा, गहू व तूर अशी पिके असून, पाणी देणे तसेच जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी ते सकाळपासून शेतात गेले होते. दुपारी अचानक झाडीतून आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात त्यांच्या हात-पायांना व शरीरावर गंभीर जखमा झाल्या.


घटनेची माहिती मिळताच धोडप येथील सरपंच प्रदीप दामोधर कोल्हे व सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. जखमी शेतकरी उत्तम परिहार यांना तात्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


दरम्यान, करवंड, धोडप व पळसखेड सपकाळ परिसरात जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वन विभाग व प्रशासनाने तातडीने जंगली प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!