खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मुलाच्या खेळण्याच्या तीनचाकी गाडीला धडक लागल्याच्या कारणावरून जाब विचारायला गेलेल्या इसमाला मारहाण करून जखमी केल्याची घटना खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथे २ जानेवारी रोजी दुपारी घडली.
टेंभुर्णा येथील गणेश देविदास बोरसे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नागेश पातुर्डे याने मुलाच्या खेळण्याच्या तीनचाकी गाडीला धडक दिली. या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता नागेश पातुर्डे याने गणेश बोरसे यांना मारहाण करून जखमी केले.
दरम्यान, महेश गोडसे, विजय गोडसे, दीपक पातुर्डे व लताबाई पातुर्डे यांनीही लोटापाटी करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. वाद सोडवण्यासाठी गणेश बोरसे यांची पत्नी आली असता पाचही आरोपींनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी नागेश पातुर्डे याच्यासह पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२), ११८ (१), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.












