देऊळघाट (अल्ताफ खान- बुलडाणा कव्हरेज न्यूज): पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, देऊळघाट येथे २३ जून रोजी शासनाच्या निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस संस्मरणीय ठरावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली. ढोलपथकाच्या गजरात नवागत विद्यार्थ्यांसह सर्वांनी सहभागी होत आनंद व्यक्त केला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे गुलाब पाकळ्यांच्या वर्षावात व पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट व सॉक्स वाटप करण्यात आले.



या प्रसंगी शाळेचे प्राचार्य आर. आर. सय्यद, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अलका किटे, उपाध्यक्ष शैलेश सब्बलवार, शिक्षणतज्ज्ञ अमोल जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत नवागत विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांच्या पालकांसह शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडले यांनी शाळेला भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यांनी शाळेच्या स्वच्छता, नियोजन व शैक्षणिक कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
या उत्सवातील आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे “सेल्फी पॉइंट”. नवागत विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांनी, पालकांनी व शिक्षकांनी सेल्फी घेत आपल्या नव्या वाटचालीच्या क्षणांना आठवणीत ठेवलं.
कार्यक्रमात डॉ. रणजीत मंडले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्यदायी सवयी आणि त्याचा शिक्षणाशी असलेला संबंध स्पष्ट करत मार्गदर्शन केले. प्राचार्य आर. आर. सय्यद यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांची उच्च शैक्षणिक पात्रता, नियोजन, गुणवत्ता वृद्धीचे प्रयत्न यांचा उल्लेख केला. तसेच शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, गावकरी, पालक तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल कड, मोहम्मद सलमान आणि प्रल्हाद शेनफड गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सय्यद अनिस यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश, बुट-सॉक्स्, आणि पाठ्यपुस्तके मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य् व आनंद निर्माण झाला. विद्यार्थ्यांना याप्रसंगी गोड भात / खिर चे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
1 thought on “‘एक पेड मा के नाम’ उपक्रमासह देऊळघाटमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव; सेल्फी पॉइंट ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू”