खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – शहरात भरदिवसा चोरीचा थरारक प्रयत्न उघडकीस आला आहे. सनी पॅलेसजवळ दोन युवकांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ५ लाख ६९ हजार रुपयांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, युवकांच्या धैर्यामुळे ही चोरी टळली असून चोरट्यांचा डाव फसला.
ही घटना मंगळवार, ११ जून रोजी घडली. मंगलसिंग पवार (वय २१) हे आपल्या सहकाऱ्यासह ५ लाख ६९ हजार ८६० रुपयांची रक्कम घेऊन जात होते. ते सनी पॅलेसजवळ पोहोचले असता, एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने दोघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या दोघांनी घाबरून न जाता चोरट्याचा प्रतिकार केला आणि बॅग वाचवली. त्यामुळे चोरटा आपला हेतू अपयशी ठरल्याने दुचाकीवरून पळून गेला. या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी मंगलसिंग पवार यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.