खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील घारोड येथे मध्यरात्री शेतकऱ्याच्या गोठ्याला अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. या आगीत जनावरांसाठी साठवून ठेवलेला सोयाबीन व तुरीचा कुटार, चारा तसेच शेतीसाठी लागणारे विविध साहित्य जळून खाक झाले. ऐन शेतीच्या हंगामात घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी वसंत सखाराम दुतोंडे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घारोड येथील शेतकरी वसंत सखाराम दुतोंडे यांच्या गोठ्याला मध्यरात्री अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोठ्यात ठेवलेला चारा आणि शेती उपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सोयाबीनचा कुटार, तुरीचा कुटार आणि इतर कृषी साहित्य जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच वैभव किशोर ठाकरे यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग आजूबाजूला पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
मात्र, या आगीत शेतकऱ्याच्या गोठ्यातील चारा आणि शेतीसाठी साठवून ठेवलेले साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेतीच्या संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यावर या आगीमुळे आणखी संकट ओढवले आहे. या नुकसानीची पाहणी करून संबंधित प्रशासनाने पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













