मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): दोन व्यक्तींमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय महिलेला काठीने मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अंढेरा येथे १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या मारहाणीत महिलेच्या हनुवटीवर दुखापत झाली असून, तिच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंढेरा येथील मंगलाबाई समाधान इंगळे (वय ६०) या शेतातील काम आटोपून घरी आल्या होत्या. त्यावेळी पिराजी कांबळे यांचा मुलगा भीमराव कांबळे आणि लक्ष्मण गुंजकर यांच्यात वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा वाद सोडविण्यासाठी मंगलाबाई इंगळे या पुढे गेल्या.
यावेळी आरोपी लक्ष्मण गुंजकर, मुकेश गुंजकर व शालिकराम इंगळे यांनी मंगलाबाई इंगळे यांना काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये त्यांच्या हनुवटीवर काठी लागून दुखापत झाली. तसेच आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मंगलाबाई इंगळे यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी लक्ष्मण गुंजकर, मुकेश गुंजकर व शालिकराम इंगळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार पुढील तपास करीत आहेत.













