Advertisement Advertisement

पोरीने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण त्रास काही थांबेना;शेवटी बाप पोलिसांत पोहोचला, २३ वर्षीय तरुणावर पॉस्कोचा गुन्हा!

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीला मोबाईलवर संदेश पाठवून त्रास दिल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ७५, ७८ तसेच पॉस्को कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शेगाव शहरातील जगदंबा चौक परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगी शिक्षणासाठी एका खासगी क्लासेसमध्ये आली होती. यावेळी तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी आली. तिच्या मोबाईलवर एका क्रमांकावरून संबंधित अल्पवयीन मुलीबाबत संदेश आलेले असल्याचे समोर आले. या संदेशांमध्ये मुलीची विचारपूस करण्यात आली होती.

मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मोबाईल क्रमांक हा सुरज जानकीराम गावंडे (वय २३, रा. आलेगाव, ता. पातूर, जि. अकोला) याचा असल्याचे सांगण्यात आले. संबंधित तरुणाकडून यापूर्वीही मुलीला त्रास होत असल्याचे तिच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मुलीचे दहावीचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष सुरू असल्याने तिने सुरुवातीला संबंधित प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्रास वाढत असल्याने तसेच भविष्यात पुन्हा त्रास होण्याची शक्यता असल्याने अखेर तिने कुटुंबीयांच्या माध्यमातून पोलिसांत तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी संबंधित तरुणाविरुद्ध पॉस्को कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश भामोदकर करीत आहेत. दरम्यान, पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!