Advertisement Advertisement

AI भारी हाय… पण जरा जपून!फोटो अन् वैयक्तिक माहिती कुठंही टाकू नका;उद्या हाच डेटा अडचणीत आणू शकतो!

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहे. फोटो तयार करणे, फोटोमध्ये बदल करणे, मजकूर लिहिणे, व्हिडिओ तयार करणे यासह विविध कामांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात एआय साधनांचा वापर करीत आहेत. मात्र एआयचा वापर वाढत असताना वैयक्तिक माहिती, फोटो आणि डिजिटल सामग्रीच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

आज अनेकजण कोणताही विचार न करता आपले फोटो, वैयक्तिक माहिती किंवा इतर तपशील विविध एआय साधनांमध्ये अपलोड करीत आहेत. सध्या त्याचा कोणताही त्रास जाणवत नसला, तरी भविष्यात या माहितीचा गैरवापर, चुकीच्या संदर्भात वापर किंवा अनधिकृत प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एआयचा वापर करण्यापूर्वी संबंधित सेवेकडून माहिती कशी साठवली व वापरली जाते, याची माहिती घेणे आवश्यक आहे.

विशेषतः महिला, लहान मुले आणि कुटुंबातील सदस्यांचे फोटो एआयच्या माध्यमातून बदलताना किंवा सोशल मीडियावर शेअर करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. एआयच्या मदतीने फोटो आणि व्हिडिओमध्ये वास्तवासारखे बदल करणे शक्य असल्याने भविष्यात बनावट किंवा चुकीच्या स्वरूपातील डिजिटल सामग्री तयार होण्याचे आव्हानही वाढू शकते.

त्याचप्रमाणे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खात्याची माहिती, पासवर्ड, मोबाईल क्रमांक किंवा इतर गोपनीय कागदपत्रे कोणत्याही अनोळखी एआय सेवेत अपलोड करणे टाळावे. एआय हे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान असले, तरी त्याचा वापर करताना गोपनीयता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. ‘एआय वापरा, पण माहिती जपून द्या’, ही काळाची गरज बनली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!