Advertisement Advertisement

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर महसूलमंत्री बावनकुळे! आज अकोला, बुलढाणा जिल्ह्याचा दौरा; पिकांची पाहणी करणार, शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारणार!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्याचे महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त भागातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच विविध ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांची निवेदनेही स्वीकारणार आहेत.

बावनकुळे यांच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता अकोला येथील शासकीय विश्रामगृहातून होणार आहे. येथे ते नागरिकांची निवेदने स्वीकारतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता अकोला तालुक्यातील येवता येथे दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी करतील. दुपारी १२.३० वाजता बाळापूर तालुक्यातील मानकी येथेही ते शेतातील पिकांची स्थिती जाणून घेणार आहेत.

दुपारी १.३० वाजता बावनकुळे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात आगमन करून दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता खामगाव येथील शासकीय विश्रामगृहात नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत. या वेळी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, सायंकाळी ५.१५ वाजता ते मलकापूर तालुक्यातील रणथाम येथे भेट देऊन दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी करणार आहेत. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या पाहणीनंतर शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळ निवारणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!