चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील एका गावातील सरकारी शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाच्या गैरजबाबदार वर्तणुकीमुळे संतापाची लाट उसळली आहे. संबंधित शिक्षक वारंवार दारूच्या नशेत शाळेत येत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे. अनेक वेळा समज देऊनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नसल्याचे सांगितले जात आहे.
शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतो, त्याच्याकडूनच विद्यार्थ्यांचे शिक्षण व संस्कार घडत असतात. मात्र संबंधित शिक्षकाने आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करून शाळेच्या शिस्तीला तडा दिल्याचा आरोप आहे. काही वेळा तो इतक्या नशेत असतो की शाळेत पोहोचतही नाही, अशी माहिती स्थानिकांकडून समोर येत आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन तातडीने चौकशी करून संबंधित शिक्षकावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर कारवाई झाली नाही तर परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते हे जिल्हा परिषद अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन बसून राहणार असल्याचे त्यांनी चर्चा केली..
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि भविष्याचा प्रश्न असल्याने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.















