विजेच्या धक्क्याने ५२ वर्षीय महिला मजुराचा मृत्यू; आव्हा शिवारातील हृदयद्रावक घटना…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मोताळा तालुक्यातील आव्हा शिवारात शेतात कामासाठी जात असताना विद्युत प्रवाही तारेला स्पर्श झाल्याने ५२ वर्षीय महिला मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, ६ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घडली. मृत महिला व तिचे पती दोघेही दिव्यांग असून भूमिहीन अवस्थेत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कोल्ही गवळी येथील कमलबाई डिगंबर भारती (वय ५२) या गावातील ३ ते ४ महिलांसह आव्हा शिवारातील माकोडी येथील शेतकरी डिगंबर सुरेश बढे यांच्या शेतात कामासाठी जात होत्या. नेहमीच्या रस्त्यावर मधमाशांचा उपद्रव असल्याने सर्व महिला पर्यायी मार्गाने मक्याच्या शेतातून जात असताना तेथे जमिनीवर पडलेली विद्युत प्रवाही तार कमलबाई यांच्या संपर्कात आली. जोरदार करंट बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या महिलांनी प्रसंगावधान राखत दूर पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले.
मृत कमलबाई भारती या दिव्यांग होत्या. त्यांचे पती डिगंबर भारती हेही दिव्यांग असून या दांपत्याला अपत्य नाही. भूमिहीन असल्याने मोलमजुरीवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गात संतापाची भावना निर्माण झाली आहे.

घटनास्थळी काही काळ मोठा जनसमुदाय जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेश जायले, कोल्हीचे सरपंच शिवाजीराव बोराडे, माजी सभापती अवि पाटील, आव्हा सरपंच स्वप्नील घोंगटे, गणेश घडेकर, देवराज शिंदे, धोंडूभाऊ शिंदे, गुलाभाऊ महाजन आदींनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती शांत केली.

यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मलकापूर येथे पाठवण्यात आला. या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून मर्ग दाखल करण्यात आला आहे. दिव्यांग व भूमिहीन कुटुंबावर ओढावलेल्या या संकटामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!