डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मेहकर शहरात पत्नी व चिमुकल्या मुलाचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी राहुल मस्के याला पोलिसांनी अटक केली असली, तरी या गुन्ह्यात सासरच्या कुटुंबीयांचाही सहभाग असल्याचा आरोप करत मृत रूपालीच्या माहेरच्या नातेवाइकांनी बुधवारी (दि. ३१) दुपारी मेहकर पोलीस ठाण्याला घेराव घातला. तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मेहकर शहरात २९ डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास राहुल मस्के याने पत्नी रूपाली व मुलगा रियांश यांच्यावर झोपेत असतानाच कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने हे अमानुष कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपी राहुल मस्के याला अटक केली.
दरम्यान, रूपालीच्या माहेरच्या नातेवाइकांनी सासरच्या लोकांकडून तिला सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. केवळ पतीच नव्हे, तर दीर, सासू व सासरेही या हत्येस जबाबदार असल्याचा दावा करत त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. “जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही,” असा ठाम पवित्रा संतप्त नातेवाइकांनी घेतला.
आंदोलनादरम्यान जमाव आक्रमक झाल्याने कायदा…
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दंगा काबू पथक तैनात करण्यात आले होते. अखेर पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी सुरू असून, दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले.
या संदर्भात ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांनी सांगितले की, “रूपाली व रियांशच्या खून प्रकरणात आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. तपास सुरू असून, आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”











