देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :तालुक्यातील किन्हीपवार येथे होऊ घातलेला अल्पवयीन मुलीचा बालविवाह देऊळगाव राजा पोलिसांच्या सतर्क आणि तत्पर कारवाईमुळे ऐनवेळी थांबवण्यात आला. या घटनेमुळे प्रशासनाची कार्यक्षमता तसेच जागरूक नागरिकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ मे रोजी देऊळगाव राजा पोलिसांना किन्हीपवार येथे एका १८ वर्षांखालील मुलीचा विवाह ३ मे २०२६ रोजी होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम व संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथक रवाना केले.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्यासह पोलीस अंमलदार विकास पटेल, प्रमोद मुळे, रामकिसन गिते, समाधान गिते, महिला पोलीस अंमलदार शीतल नांदे आणि चालक पोलीस अंमलदार विजय दराडे यांचा समावेश होता.
पथकाने घटनास्थळी पोहोचून संबंधित मुलीचा शोध घेतला असता, ती आपल्या आई-वडिलांसोबत आढळून आली. त्यावेळी विवाहपूर्व विधी सुरू असल्याचेही निदर्शनास आले. चौकशीत संबंधित मुलगी केवळ १५ वर्षे ६ महिने वयाची असल्याचे स्पष्ट झाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत विवाह प्रक्रिया थांबवली. यानंतर संबंधित कुटुंबीयांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत सविस्तर माहिती देत समज देण्यात आली.
या कारवाईबाबत पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी सांगितले की, “बालविवाह ही गंभीर सामाजिक समस्या असून, त्याचे निर्मूलन करण्यासाठी प्रशासनासोबतच समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.”
देऊळगाव राजा पोलिसांची ही कारवाई बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी ठरत असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी आहे.














