बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :
चिखली तालुक्यातील पाटोदा गावात आज सकाळी एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात ६५ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले असून, दुचाकी चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. एसटी बसच्या बाजूला बाहेर निघालेल्या लोखंडी पत्र्यामुळेच हा अपघात घडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आज सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास चिखली आगाराची पेन सावंगी–चिखली ही नियमित धावणारी एसटी बस पाटोदा गावातून जात होती. गावातील अरुंद व वळण असलेल्या रस्त्यावर समोरून जाणाऱ्या मोटरसायकलला बसने धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवर मागे बसलेले भास्कर विष्णू खंदारे (वय ६५) हे जबर जखमी झाले, तर दुचाकी चालवणारे भिकाजी काकफळे (वय ३५) यांना किरकोळ दुखापत झाली.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित एसटी बस भरधाव वेगात होती. अरुंद रस्त्यावर वेगात बस चालवली जात असूनही चालकाकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बसच्या बाजूला सुमारे १२ इंचाचा लोखंडी पत्रा बाहेर निघालेला होता. वळणावर हा पत्रा थेट मोटरसायकलवरील मागे बसलेल्या भास्कर खंदारे यांच्या अंगाला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. बसची अवस्था पाहता ती पूर्णतः अनफिट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
जुनाट व दुरुस्तीअभावी असलेल्या एसटी बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. संबंधित बसची तात्काळ तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.














