अरे बापरे बुलडाणा जिल्हा मध्ये…! ७६१ माय-माऊल्या हिंसाचाराच्या शिकार…!१२९ महिलांवर बलात्कार, २८८ जणींचा विनयभंग…भरोसा सेलने ६३० पीडित महिलांना दिला न्यायाचा आधार…..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचा मान दिला जात असला तरी प्रत्यक्षात ती आजही असुरक्षित असल्याचे विदारक वास्तव बुलढाणा जिल्ह्यात समोर आले आहे. सरत्या वर्षात जिल्ह्यात तब्बल ७६१ महिलांवर शारीरिक, मानसिक, शाब्दिक व आर्थिक स्वरूपाचा हिंसाचार झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या काळात १२९ महिलांवर लैंगिक अत्याचार (बलात्कार) तर २८८ महिलांचा विनयभंग झाल्याचे समोर आले आहे. अनेक महिलांना हा छळ घरातच सहन करावा लागत असल्याने स्त्री सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या नेतृत्वात महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्ष व भरोसा सेलने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या नऊ महिन्यांत प्राप्त ९६० कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींपैकी ६३० प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे.

यामध्ये १६५ प्रकरणांत समझोता, १४८ प्रकरणांत बीएनएस ८५ (४९८-अ) अंतर्गत कारवाई, ११४ प्रकरणांत न्यायालयात दाद घेण्याचा मार्ग, तर ३२३ प्रकरणे चौकशीवर असून २०० प्रकरणांची दप्तरी नोंद करण्यात आली आहे.

भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक शिल्पा सुरगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पीडित महिलांना समुपदेशनातून मानसिक व नैतिक बळ देत अनेक विस्कटलेले संसार सावरण्याचे कार्य केले आहे.

महिलांना सन्मान, सुरक्षितता आणि विश्वास देणे हीच खरी न्यायाची सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

कायद्याचा गैरवापरही चिंताजनक….

महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे असले तरी काही ठिकाणी त्यांचा गैरवापर होत असल्याचेही समोर आले आहे. कौटुंबिक वादातून खोट्या तक्रारी दाखल करून आर्थिक फायद्यासाठी कायद्याचा वापर केल्याची उदाहरणे आढळून येतात. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात संवेदनशीलतेसोबतच निष्पक्ष चौकशी गरजेची असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पीडित महिलांना नैतिक बळ देणे काळाची गरज

लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत पीडित महिलांकडे संशयाने पाहिले जाते, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. अशा वेळी त्यांना सन्मानपूर्वक वागणूक, समुपदेशन आणि योग्य आधार देणे अत्यावश्यक आहे. भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक शिल्पा सुरगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक महिलांचे विस्कटलेले संसार पुन्हा उभे करण्याचे मोलाचे कार्य केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!