केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केली पेंनटाकळी कालवा कामाची पायी पाहणी…! ८.१ किमी चालत अधिकाऱ्यांना कडक निर्देश; शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्याचे आदेश….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):पेंनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याच्या कामात कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांना अडचण येईल असे कुठलेही त्रुटीपूर्ण काम झाले, तर जबाबदारांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी दिला. प्रकल्पाच्या भिंतीपासून तब्बल ८.१ किलोमीटर पायी चालत त्यांनी कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
पेंनटाकळी प्रकल्पाच्या शून्य ते ११ किमी दरम्यान सुमारे ७२ कोटी रुपयांचे कालव्याचे काम सुरू आहे. या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध समस्यांकडे ना. जाधव यांनी गांभीर्याने लक्ष दिले व अधिकाऱ्यांना तात्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले.
कामादरम्यान,सहा ठिकाणी क्रॉसिंग पूल उभारणे,नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जलवाहिन्या तात्काळ जोडून देणे,वरून येणाऱ्या नैसर्गिक पाण्याचा योग्य निचरा करणे,आवश्यक ठिकाणी लोखंडी पूल टाकणे,कालवा बांधकामात ५० टक्के नैसर्गिक रेती व ५० टक्के क्रश सँड वापरणे,नुकसान भरपाई यादीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देणे,कंत्राटदारांच्या वाहनांमुळे खराब झालेला हिवरा आश्रम–दुधा रस्ता दुरुस्त करणे,कालव्यावरील रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीयोग्य करणे,अशा स्पष्ट सूचना ना. जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका….
कालवा पाझरामुळे व कामातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे पिके व जमीन नुकसानग्रस्त होत असल्याने शेतकरी एकनाथ सास्ते यांनी कालव्यातच उपोषण केले होते. त्यानंतर २३ जानेवारी रोजी अधीक्षक अभियंता यांच्या दालनात शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी मांडलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता गाडे यांनी दिले.
ना. जाधव व माजी आमदार संजय रायमूलकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्पष्ट निर्देश दिल्याने शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील, असा विश्वास शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
पाहणीवेळी उपस्थित…
या पाहणीवेळी माजी आमदार संजय रायमूलकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळूकर, शेतकरी एकनाथ सास्ते, श्यामराव पवार, लिलाबाई गाडेकर यांच्यासह अधीक्षक अभियंता गाडे, कार्यकारी अभियंता सपना डावरे, उपविभागीय अभियंता ताबागाडे, कंत्राटदार ऋषिकेश देशमुख आदी उपस्थित होते.
















