मेहकर तालुक्यातील दुधा शिवारात बिबट्याचे पिल्लू आढळले; परिसरात भीतीचे वातावरण….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) –मेहकर तालुक्यातील दुधा शिवारात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे अंदाजे २५ दिवसांचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पिल्लाला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले आहे. बिबट्याची मादी आसपासच असल्याची शक्यता लक्षात घेता वनविभागाकडून सकाळपासून शोधमोहीम सुरू आहे. मात्र, बारा तास उलटूनही पिल्लाची माता सापडलेली नाही.


या घटनेबाबत माहिती देताना घाटबोरी वनपरिक्षेत्राधिकारी अंकुश येवले यांनी सांगितले की,“दुधा शिवारात नुकतेच जन्मलेले सुमारे २५ दिवसांचे बिबट्याचे पिल्लू आढळून आले असून ते सुरक्षित आहे. मादीचा शोध घेण्यासाठी वनविभागाची पथके कार्यरत आहेत.”


दरम्यान, काल दुपारी चारच्या सुमारास दुधा परिसरासह हिवरा आश्रमजवळील पोखरी शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे बिबट्याची मादी याच परिसरात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


या पार्श्वभूमीवर वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, शेतात एकटे जाणे टाळण्याचे तसेच रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!