धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज): मजुरीच्या कामासाठी जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली ३० वर्षीय विवाहिता गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना रुईखेड मायंबा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी धाड पोलिसांनी हरवल्याची नोंद (मिसींग) दाखल केली असून महिलेचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
अनवा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील रहिवासी असलेली मनिषा शाम इच्छे (वय ३० वर्षे) ही महिला सध्या रुईखेड मायंबा (ता. जि. बुलढाणा) येथे आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजेच्या दरम्यान मनिषाने ‘मी मजुरीच्या कामासाठी जात आहे’ असे घरच्यांना सांगितले आणि ती घराबाहेर पडली. मात्र दिवसभर उलटूनही ती घरी परतली नाही. सुरुवातीला ती कामावर उशिरापर्यंत थांबली असावी, असा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला. मात्र उशिरापर्यंत कोणताही संपर्क न झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
दरम्यान, मनिषाची बहीण सुनिता खंडागळे (वय ४५ वर्षे) व इतर नातेवाईकांनी रुईखेड मायंबा परिसर, नातेवाईकांची घरे तसेच आजूबाजूच्या गावांत शोध घेतला. तिच्या मुळ गावी अनवा (ता. भोकरदन) येथेही चौकशी करण्यात आली. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही तिचा कोणताही सुगावा लागला नाही. अखेर पाच दिवसांच्या निष्फळ शोधानंतर कुटुंबीयांनी १ मार्च २०२६ रोजी धाड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
धाड पोलिसांनी या प्रकरणी मिसींग दाखल केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार शांताराम जाधव हे करीत आहेत. दरम्यान, बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.














