चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी मैत्री वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा ११ जानेवारी रोजी नोंदवण्यात आला आहे.
आरोपी नितीन शिवाजी बिल्लारी (रा. दहिद, ता. बुलडाणा) याने पीडित तरुणीशी ओळख वाढवून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आश्वासन देत विश्वासात घेतल्यानंतर काही दिवसांपूर्वी अंढेरा परिसरात एका एकांत स्थळी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आरोपीने दिली.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पीडित तरुणी लग्नाचा विषय काढू लागल्यानंतर आरोपीने सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र नंतर त्याने थेट लग्नास नकार देत आपला खरा रंग दाखवला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला असून आरोपीने पीडितेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत शारीरिक मारहाणही केली. प्रेमाच्या नावाखाली झालेली फसवणूक आणि असह्य मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने अंढेरा पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.












