Advertisement Advertisement

खून करून देशभर फिरला; दीड वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात..! जानेफळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल राजपूत अटकेत….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जानेफळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपहरण करून खून केल्याच्या गंभीर गुन्ह्यात दीड वर्षांपासून फरार असलेला मुख्य सूत्रधार अमोल जयसिंग राजपूत याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून शिताफीने अटक केली. विविध राज्यांत वेशभूषा बदलून लपून बसलेल्या आरोपीचा तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे माग काढण्यात आला.

या प्रकरणी २०२४ मध्ये जानेफळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ज्योती दिलीप इंगळे (३५, रा. इंदिरा नगर, जानेफळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती दिलीप इंगळे (४५) यांचे २२ जून २०२४ रोजी रात्री अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी संगनमताने त्यांना अहमदनगर येथे नेऊन ठार केल्याचे तपासात उघड झाले. आतापर्यंत या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तपासात अमोल राजपूत हा छत्तीसगड, चंदीगड, कर्नाटक व दिल्ली येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.

चंदीगडहून आला; जाळ्यात अडकला…!

तांत्रिक माहितीनुसार २७ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी चंदीगडहून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याचे समोर आले. २८ डिसेंबरपासून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ६ जानेवारी रोजी हॉटेल राधिका इन, पॅराडाइज चौक, छत्रपती संभाजीनगर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अविनाश जायभाये, दीपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, गजानन गोरले, आशा मोरे, निवृत्ती पूंड तसेच तांत्रिक विश्लेषण पथकातील राजू आडवे, ऋषिकेश खंडेराव, कैलास ठोंबरे, पवन मखमले यांनी मोलाची भूमिका बजावली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!