सुलतानपूर :(बुलडाणा कव्हरेज न्युज)येथून जवळ असलेल्या भानापुर येथील सुशिक्षित तरुण शेतकरी अर्जुन कचरूबा आव्हाळे (वय ३५) यांनी आर्थिक विवंचना व वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत अर्जुन आव्हाळे यांच्याकडे अवघी ५८ गुंठे शेती होती. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या हातातील संपूर्ण पीक नष्ट झाले. परिणामी सेंट्रल बँकेचे कर्ज व खासगी सावकारांची परतफेड करणे अशक्य झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होते.
दरम्यान, २७ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता त्यांनी गावालगत असलेल्या स्वतःच्या शेतातील गोठ्यात विषारी औषध सेवन केले. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
अर्जुन आव्हाळे यांच्या पश्चात पत्नी, आई, एक लहान मुलगा व भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः चिमुकल्या मुलाच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.












