खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरात पुन्हा एकदा जुन्या वादाचा स्फोट झाला असून रमाई चौक परिसरात एका तरुणावर हेल्मेटने डोक्यात मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध न्याय संहिता कलम ११८ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गणेश हरिदास पारखडे (वय ३२, व्यवसाय शेती, रा. शहापूर, ता. खामगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार गणेश पारखडे व त्यांचा भाऊ सुनिल पारखडे हे रमाई चौकातून तहसील कार्यालयाकडे जात असताना आरोपी रामेश्वर शेषराव तराळे (रा. शहापूर, ता. खामगाव) तेथे आला. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपीने सुनिल पारखडे यांच्या गळ्यातील दुपट्टा आवळून त्यांना खाली पाडले.
यानंतर आरोपीने सुनिल यांच्या डोक्यातील हेल्मेट काढून त्याच हेल्मेटने डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात सुनिल पारखडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तोंडी तक्रार व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.













