पिंपळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील राहुड येथे मोठ्या भावानेच सख्ख्या लहान भावाची लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली असून २६ फेब्रुवारी रोजी पोलिस तपासादरम्यान उघड झाली. या घटनेमुळे राहुड गावासह परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतक चेतन संजय इंगळे व आरोपी मोठा भाऊ रोशन संजय इंगळे हे दोघे सख्खे भाऊ असून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. चेतन इंगळे हा अचानक बेपत्ता झाल्याने गावचे पोलीस पाटील विलास बनसोडे यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ठाणेदार भागवत मुळीक यांनी तातडीने तपास सुरू करून विशेष पथक नेमले.
दरम्यान, चेतनचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी संशयावरून त्याचा भाऊ रोशन इंगळे याची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या रोशनने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने २५ फेब्रुवारीच्या रात्री स्वतःच्या शेतात लोखंडी रॉडने चेतनच्या डोक्यावर वार करून त्याची हत्या केल्याचे सांगितले. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून त्याची राख व अवशेष पूर्णा नदी पात्रात टाकल्याचेही त्याने कबूल केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ खामगाव येथील फॉरेन्सिक पथक व अकोला येथील डॉग स्कॉडला पाचारण केले. घटनास्थळी तपासादरम्यान मानवी अवशेष व अन्य पुरावे आढळून आले.
पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी रोशन इंगळे याच्यासह त्याला मदत करणारा रवी राऊत (वय ३५, रा. महाकाल चौक, खामगाव) याला अटक केली आहे. दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा गुन्हा व पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी एएसपी श्रेणिक लोढा, डीवायएसपी प्रदीप पाटील व पोलीस निरीक्षक भागवत मुळीक यांनी भेट देऊन तपासाची पाहणी केली. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या तत्परतेमुळे काही तासांत गुन्ह्याचा उलगडा
ठाणेदार भागवत मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने वेगाने तपास करून अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावला. मुख्य आरोपी हा मृतकाचा भाऊच असल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.














