धाड, (बुलडाणा कव्हरेज न्युज) वेगाची नशा आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय धाड येथील वळण मार्गावर सोमवारी सायंकाळी आलेल्या भीषण अपघातातून आला. स्विफ्ट डिझायर कार आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या जोरदार धडकेत ट्रॅक्टर अक्षरशः तीन तुकड्यांत विभागला गेला, तर कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास धाड येथील वळण मार्गावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना समोरासमोर येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार आणि ट्रॅक्टरची भीषण धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅक्टरचे इंजिन व मागील भाग वेगळे होऊन रस्त्यावर विखुरले गेले. अपघाताचे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
या अपघातात कार चालक आशिष तायडे (रा. करडी) हा जखमी झाला असून त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांची झालेली अवस्था पाहता हा अपघात किती भीषण होता, याची कल्पना येते.
घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. मात्र, एवढा गंभीर अपघात होऊनही उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आज ट्रॅक्टरचे तुकडे झाले, उद्या अशा बेफिकीरपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.














