देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करत माजी सैनिकाच्या घरावर डल्ला मारल्याची घटना मंगळवारी (दि. ४ फेब्रुवारी) पहाटे १.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे देऊळगाव मही शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, वार्ड क्रमांक ६ मधील रहिवासी माजी सैनिक रघुनाथ माधव मुजमुले (वय ४९) यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घराच्या हॉलचा दरवाजा बाहेरून दोरीने बांधून चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दाग-दागिने, अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये, लंपास करून चोरटे घराच्या पाठीमागील बाजूने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपासासाठी बुलढाणा येथील श्वानपथक व फॉरेन्सिक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकीचे इन्चार्ज कलीम देशमुख व पो. हे.कॉ. शरद साळवे करीत आहेत.













