डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर शहरात नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या बाजूला करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्विमिंग पूलचे अद्याप लोकार्पण झालेले नसल्याने शहरातील युवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर स्विमिंग पूल तात्काळ कार्यान्वित करून त्याचे लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी मेहकर येथील युवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रामराजे कापरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मेहकर नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी शहरातील युवकांसाठी सार्वजनिक स्विमिंग पूलची उभारणी केली होती. मात्र, अनेक वर्षांपासून या स्विमिंग पूलचे गेट बंद असून तो वापराविना पडून आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात असल्याचा आरोप युवकांनी केला आहे.
मेहकर शहरात युवकांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी पुरेशी क्रीडांगणे उपलब्ध नाहीत. तसेच, शहरात कोणतेही सार्वजनिक उद्यान किंवा मनोरंजनासाठी योग्य ठिकाण उपलब्ध नसल्याने युवकांसाठी हा स्विमिंग पूल अत्यंत आवश्यक आहे. तरीदेखील सदर स्विमिंग पूल बंद ठेवण्यात आल्याचे कारण काय, हे सार्वजनिक करण्यात यावे किंवा तात्काळ तो कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर दानिश खान, शेख इमरान, शेख साहिल, शेख इरफान, शेख कासिफ, आदेश जागीरदार आदी युवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.













